सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला सायकल बँक हा उपक्रम जिल्ह्यामध्ये चळवळीचे रूप धारण करत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे सात ते आठ हजार मुली केवळ सायकल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत होत्या ही माहिती जेव्हा शिक्षण विभागाने समोर आणली तेव्हा या मुलींसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सायकल बँक ही संकल्पना समोर आणली. सध्या जिल्ह्यामध्ये सुमारे दोन हजारापर्यंत सायकलचे वाटप करण्यात आले आहे.
मंगळवारी दिलीप स्वामी हे मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर होते. पंचायत समितीमध्ये त्यांनी कामकाजाची आढावा बैठक घेतली. यावेळी सायकल वितरणाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. मंगळवेढा पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या वतीने 100 सायकली जमा झाल्या होत्या. त्या सायकलीचे वितरण तालुक्यातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना करण्यात आले. हातात सायकल पडल्याचा वेगळाच आनंद मुलींच्या चेहऱ्यावर दिसून आला. त्यांनी सायकल मिळाल्याचा आनंद बोलूनही दाखवला.



















