सोलापूर : माजी नगरसेवक राजशेखर पाटील उर्फ बाळू पाटील यांचे बुधवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 55 होते. पश्चात 2 मुले, पत्नी असा परिवार आहे.
भवानी पेठेतील युवकांच्या हृदयावर राज्य करणार व्यक्तिमत्व म्हणजे बाळू पाटील तर मोठ्यांसाठी बाळू, कार्यकर्त्यांसाठी आप्पासाहेब होते.
लोकांच्या कामासाठी 24 तास कर्तव्यदक्ष काम करणारे एक धाडसी नेतृत्व म्हणून सगळ्यांना परिचित होते.
सत्तेत आणि नगरसेवक नसतानाही गेली तीस वर्षे त्यांनी राजकारण व समाजकारण यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. सत्तेत नसताना ही चर्चेत असणारे नाव म्हणजे बाळू पाटील होते. कोणताही कार्यकर्ता, कोणतीही व्यक्ती कामासाठी त्यांच्याकडे गेले असता बाळू पाटील यांनी त्यांचे काम केले नाही असे झाले नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
बाळू पाटील यांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवली तरी त्यांना मानणारा एक मोठा गट होता. ते शिवसेनेकडूनही नगरसेवक झाले होते. तसेच पोटनिवडणुकीत जनस्वराज्य पार्टी कडूनही नगरसेवक म्हणून निवडून आले होते.



















