सोलापूर : हैदराबाद रोड परिसरातील गंगाई केकडे नगर या ठिकाणच्या महिला लहान मुलं आणि वृद्ध यांनी महापालिकेवर मोठा घागर व कळशी मोर्चा काढला. दिवाळीपर्यंत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
गंगाई खेकडे नगर विकास समितीचे अध्यक्ष रियाज मोमीन, जनरल सेक्रेटरी भीमाशंकर लोहार, सेक्रेटरी अंदाणी सुतार, सदस्य नम्रता हरे, सदस्य जयश्री बनसोडे, सिद्धराम कांबळे, धनाजी सातपुते, सचिन सोनवणे, अनुसया पात्रे, आनंद गायकवाड, गणेश गायकवाड, सुनील नागेशी, मनीषा माने, रेणुका बेळळे, उषा कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन आपल्या मोर्चाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले..
जोपर्यंत पिण्याचे पाईपलाईन घालून दिली जात नाही तोपर्यंत आम्हाला दररोज तीन ते चार टँकर पाणी देण्याची व्यवस्था करावी, गंगाई केकडे नगर मध्ये पाण्याची टाकी आहे ती ताब्यात घेऊन आम्हाला पाणी द्यावे याच टाकीतून आजूबाजूच्या 15 नगरांना पाणीपुरवठा होऊ शकतो यासह इतर मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान विकास समितीचे अध्यक्ष रियाज मोमीन यांनी अधिक माहिती देताना केकडे नगरच्या मालकावर संताप व्यक्त केला, जर महापालिकेने दिवाळीपर्यंत आम्हाला पाणी दिले नाही तर टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करू असा इशारा मोमीन यांनी दिला.



















