सोलापूर : बेटी बचाओ, बेटी पढाओ हे केवळ तोंडी न बोलता आणि कागदावर न ठेवता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हा उपक्रम प्रत्यक्षात उतरवला आहे. सायकल बँकेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींना प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे. एक नाही दोन नाही तर एकूण 2 हजार सायकली या उपक्रमांतर्गत जमा झाल्या आहेत.
सोमवारी वि गु शिवदारे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर मार्केट यार्ड भुसार आडत व्यापारी संघ व सिद्धसंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तब्बल 75 सायकली भेट देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा स्वीकार केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धसंग प्रतिष्ठानचे प्रकाश वाले यांच्यासह भुसार आडत व्यापारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिष्ठानच्या कार्यालयात सीईओ स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांनी आजोबा गणपतीची आरती केली.
दरम्यान शिवदारे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची सायकल बँक ही एक चांगली संकल्पना आहे, त्यांनी आमच्या कार्यक्रमात या संकल्पनेची माहिती दिली, यामध्ये आमचा छोटासा वाटा म्हणून आमच्यावतीने 75 सायकली भेट दिल्या आहेत या उपक्रमातून निश्चितच ग्रामीण भागातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहेत.
सीईओ स्वामी म्हणाले, जिल्हा परिषदेची सायकल बँक हा उपक्रम आता चळवळ बनला आहे. ग्रामीण भागातील मुली सायकल नसल्याने शिक्षणापासून वंचित होत्या परंतु या उपक्रमांतर्गत त्यांना सायकल मिळाल्याने निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढणार असल्याने ही सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असणार आहे. 75 सायकली यांनी दिल्याने मी त्यांचे आभार मानतो.



















