सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कोळेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य, ग्रामस्थ आपल्या उपसरपंच यांच्यासह सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन धडकले. या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. गावच्या सरपंच पुतळाबाई भानुदास शिंदे या प्रशासकीय बदलीने आलेल्या महिला ग्रामसेवकला काम करू देत नाहीत, हे तीन महिने झाले सुरू आहे. सरपंच यांना सूचना करावी अशी एकमुखी मागणी केली.
काही वेळा पूर्वी मोहोळ तालुक्यातील वाफळे इथल्या एका ग्रामस्थाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे स्वामी हे त्या गोंधळात होते. त्यांनी थेट ग्रामसेवकाची बदली करून दुसरा ग्रामसेवक देण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले. कोळेगाव ग्रामस्थ मात्र त्याच ग्रामसेवकावर अडून बसले तेव्हा चिडलेल्या स्वामींनी तुम्ही बसा माझ्या खुर्चीवर मी येतो तुमच्या ठिकाणी आणि घ्या निर्णय या भाषेत संताप व्यक्त केला.
त्यांचे निवेदन स्वामी यांनी स्वीकारले. सर्व ग्रामस्थ बाहेर आले उपसरपंच माधव देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. सरपंच पती भाऊराव शिंदे हे जाणीवपूर्वक ग्रामसेवकाना काम करू देत नाहीत, जुना वाद उकरून काढत आहेत. जर जिल्हा परिषद प्रशासनाने दुसरा ग्रामसेवक दिला तर आम्हाला मान्य नाही, आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला.
सोमवारी जे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांच्याच पॅनल मधून सरपंच पुतळाबाई शिंदे या निवडून आल्या होत्या, परंतु नंतर त्या आमच्या पॅनल मधून फुटून विरोधकांना जाऊन मिळाल्या आहेत, जसे सत्तेतून एकनाथ शिंदे फुटले तसेच आमचे सरपंच पती भानुदास शिंदे फुटले आहेत अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते.



















