सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची सोलापुरात शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्याचे नूतन संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी दिसून आली. या बैठकीला सोलापुरातील संभाजी आरमार या संघटनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय सरवदे हे उपस्थित होते.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. संभाजी आरमार मध्ये जिल्हाप्रमुख पद भोगलेल्या सरवदे यांच्यावर सोलापुरातील प्रमुख नेत्यांनी विश्वास ठेवत त्यांच्यावर उपजिल्हाप्रमुख ही मोठी जबाबदारी दिली आहे. संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी त्यांची थेट उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करत नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहराध्यक्ष मनोज शेजवाळ यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
निवडीनंतर बोलताना संजय सरवदे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात काम करणार असून निश्चितच या पदाला न्याय देऊ आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे महान उंचावू अशी ग्वाही दिली.




















