सोलापूर : राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत हे रविवारी रात्री तुळजापूरकडून पुण्याकडे जात असताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्या शिवशक्ती हॉटेल येथे भेट दिली याठिकाणी एक तास थाबून चहा घेतला व चर्चा केली व बरेच डॉक्टर,कार्यकर्ते मंत्री महोदयांना भेटण्यास आले होते एक तासानंतर ते पुण्याकडे रवाना झाले.
यावेळी विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या प्रकरणात पुढाकार घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चहा घेतला बराच वेळ त्यांच्यासोबत बंद कार्यालयात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या रात्रीच्या भेटी मागील उद्देश काय? दिलीप कोल्हे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक तर नाहीत ना? असे प्रश्न या भेटीमुळे उपस्थित होत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी मनोज शेजवाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात जाऊन दिलीप कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, माजी शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कारभारावर कायमच दिलीप कोल्हे हे टीका करत आले आहेत. हे पद बदलण्यासाठी ते कायमच आक्रमक दिसून आले. दरम्यानच्या काळात महेश कोठे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर दिलीप कोल्हे हे कोठे यांच्यासोबत दिसले मात्र आता कोठे यांनी राष्ट्रवादी पासून दूर राहणे पसंत केल्याने कोल्हे यांच्या भूमिकेबाबत ही तर्कवितर्क काढले जात आहेत.























