सोलापूर : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. जसे राज्यात सरकार आले तसेच सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली. ज्या महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सोलापूर महापालिकेत सत्तेचे स्वप्न दाखवले होते, तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात गेले.
त्यामुळे तर त्यांच्यावर भरोसा ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेल्या ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले, यु एन बेरिया, बिज्जू प्रधाने यांच्या पोटात गोळा आला. प्रधाने यांनी तर थेट अजित पवारांना भेटून आपली कैफियत मांडल्याचे दिसून आले.
दरम्यान सोलापुरातील काही वृत्तपत्रातून बातम्या वाचायला मिळाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहराच्या अध्यक्ष पदी सुधीर खरटमल यांची निवड निश्चित झाली आहे लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूर या संस्थेने सुधीर खरटमल यांना पुरस्कार देऊन गौरविले. याच कार्यक्रमात
खरटमल यांनी भाषण करताना मी जरी शरीराने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलो मनाने अजूनही काँग्रेस पक्षात असल्याचे सांगून चर्चेला तोंड फोडले आहे. आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस मध्ये घातलेल्या खरटमल यांनी अचानक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला होता.



















