तुळजापूर, ता. ३०: शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड मोहीम’ काल पंढरपूर, तुळजापूर येथे पोचली. देवीचे दर्शन केले. यावेळी आरती झाली. या निमित्ताने महिलांच्या आरोग्य, विकास आणि प्रतिष्ठेचे सामाजिक स्थान मिळावे. त्यातून त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी. महिलांच्या विकासाची गंगा राज्यात अखंडित प्रवाहित राहावी अशी प्रार्थना आज तुळजाभवानी मंदिरात केल्याचे शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘राज्यातील विविध विषयांवर काम करीत असलेल्या महिलांशी भक्ती, प्रेममय संवाद होण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले आहे.स्थानिक पातळीवर असलेल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या मोहिमेत हिरीरीने सहभागी झाल्या आहेत.’
सोलापुरात सामाजिक विषयांवरील पोस्टर प्रदर्शन शासकीय विश्रामगृहावर महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांनी या निमित्ताने केले आहे. हुंडाबळी, महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री शिक्षण, कौटुंबिक हिंसाचार, वृद्धांची काळजी अशा सामाजिक जाणिवेच्या विषयांवर या निमित्ताने जनजागृती करणाऱ्या या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन शिवसेना महिला आघाडी सोलापूर शहराच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, दीपा पाटील, शीतल शेठ, महिला आघाडीच्या पदाधिकारी अस्मिता गायकवाड, आशा टोणपे, श्यामल पवार, सुनीता मोरे, स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले, पुरुषोत्तम बर्डे, संभाजीराजे शिंदे, बजरंग पाटील, गणेश इंगळे, आदी उपस्थित होते
—————


















