सचिनदादांमुळे ‘ग्लॅमर’ सुभाषबापूंनी केला ‘इगो’ तर विजयमालक निघाले ‘स्मार्ट ‘
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या रविवारी म्हणजेच 27 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. संपूर्ण शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्याला कारण ही तसेच असून ही निवडणूक थेट भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये होत असल्याने त्याला महत्त्व आले आहे.
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप नेते अविनाश महागावकर, माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांना सोबत घेत सर्वपक्षीय पॅनल केले आहे. दिलीप माने, सुरेश हसापुरे यांची सहकारातील ताकद ओळखून आणि आपल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पदे देण्यासाठी सचिन कल्याणशेट्टी यांनी माने, हसापूरे यांच्या सोबत जाणे पसंत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच हे सर्व केल्याचे कल्याणशेट्टी सांगतात.
पण त्या विरोधात आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आपले पॅनल उभे केले असून यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक धणेश आचलारे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी उभा केलेल्या या पॅनल साठी आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे, काका साठे, बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते, जाफरताज पाटील यांना सोबत घेतली आहे त्यामुळे सुभाष देशमुख यांचे पॅनल हे भाजपचे कसे असा प्रश्न आता विरोधक करू लागले आहेत.
दुधनी बाजार समिती एक हाती मिळविण्यात यश मिळवलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे या निवडणुकीत एक प्रकारे ग्लॅमर आल्याचे दिसून येते तर आमदार सुभाष देशमुख यांनी या विषयात आपला इगो मध्ये आणल्याने ही निवडणूक लागली असल्याचे बोलले जाते. देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे उमेदवार असल्याने बापूंचे अस्तित्व पणाला लागले आहे.
मागच्या वेळी शेतकऱ्यांमधून मतदान होते परंतु यंदा सोसायटी सभासद, ग्रामपंचायत सदस्य यांच्यातून हे मतदान असल्याने सलग पाच वर्षे सभापती राहिलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनी माघार घेत आणि सुभाष देशमुख यांना पाठिंबा देत आपला स्मार्टपणा सिद्ध केला आहे.