सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या दत्त चौकातील कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विजय पुकाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांचा वाढदिवस सत्कार करताना त्यांना हनुमान चालीसा भेट दिली.
सत्कारानंतर बरडे म्हणाले, राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक सर्वत्र हनुमान चालीसाचे पठण करत होती, यातून ते हिंदुत्व दाखवून देण्याचा प्रयत्न होता परंतु जेव्हा शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले ते हिंदुत्व विसरले आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिनी पुष्पगुच्छ न देता त्यांना हनुमान चालीसा भेट दिली आणि त्यांना आम्ही हिंदुत्वाची आठवण करून दिली असा टोला बरडे यांनी हाणला..



















