सोलापूर शहरात आणि आसपासच्या परिसरात अनेक वन्यजीव प्राणी आढळून येत आहेत. गेल्या दीड वर्षांपूर्वी सोलापूर शहराजवळ असलेल्या चिंचोली एमआयडीसी परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यानंतर अक्कलकोट तालुका परिसरात गवा आढळून आल्याचं समोर आलं तर कोरोना काळात तुळजापूर रोड वरती असलेल्या एका गावाजवळ निलगाय जखमी अवस्थेत मिळाली होती. वनविभागाने आणि नेचर कंजर्वेशन सर्कलने त्यावर उपचार केले होते.
तर शहरात देखील अनेक वेळा वानरे दिसून येतात मात्र आता सोलापूर शहरातील समाचार चौक परिसरात साळींदर प्राणी आढळून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. साळींदर प्राणी हा मुळात जंगलात राहणारा असून त्याच्या अंगावर काटेरी असे काटे असलेले पिसारे असतात.
स्वतःच्या रक्षणासाठी तो काटेरी पिसारे फुलवत असतो मात्र आता समाचार चौकातील एका सीसीटीव्ही कॅमेरात तो वावरत असताना दिसून आला आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांना माहिती मिळताच त्यांनी कळविले आहे की, नागरिकांनी घाबरून न जाता या प्राण्यास मारू नये आणि तो दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.




















