सोलापूर- मिळालेली माहिती अशी की, शासकीय रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बाहेरील नागरिक मारहाण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पहिली असता 21 ऑक्टोबर रोजी मारहाण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विद्यार्थ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता,मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी माहिती देण्यात नकार दिला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंद झाला नाही.
21 ऑक्टोबर रोजी मारहाण झाल्याचे आले समोर
एका विद्यार्थ्याने माहिती देताना सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 21 ऑक्टोबर रोजी काही जणांनी घुसून धुडगूस घातला. यामध्ये काही विद्यार्थ्यांना बाहेरील लोकांनी घेऊन मारहाण केली आहे. याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही. सिव्हिल हॉस्पिटल मधील सुरक्षा रक्षकांनी ही मारामारी सोडविली होती. पण या मारहाणीमुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.






















