सोलापूर : 31 ऑक्टोबर रोजी 25000 रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.
त्यानुसार राज्य शासनाकडून आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी क्र. निलंब २०२२/प्र.क्र.२५३/प्रशा-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ या आदेशानुसार
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (गट-अ), जि.प.सोलापूर यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.





















