सोलापूर : कोषागार कार्यालयातील लेखा लिपिक अश्विनी देविदास बडवणे यांनी तक्रारदार यांच्या वडिलांची पेन्शन रक्कम आईच्या नावे मिळण्यासाठी रक्कम रुपये 6000 मागणी करून त्याच दिवशी पहिला हप्ता म्हणून रक्कम रुपये 1500 स्वीकारले. पेन्शनच्या कागदपत्रावर सकारात्मक अहवाल देऊन पुढे पाठवण्यासाठी उर्वरित रक्कम रुपये 4500 मागणी तक्रारदाराकडे केल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे आरोपी अश्विनी बडवणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती.
तक्रारदाराकडून रक्कम रुपये 4500 स्वीकारताना लेखा लिपिक अश्विनी बडवणे यांना कोषागार कार्यालय, सोलापूर येथे रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपीच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी आरोपी अश्विनी बडवणे यांची रक्कम रुपये २०,००० च्या जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपी अश्विनी बडवणे यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजूल यांनी काम पाहिले.


















