सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते काका साठे हे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये आले. ते मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात गेले ते जेव्हा बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी तातडीने जिल्हा परिषदेमध्ये येऊन जाण्याचे कारण काय असे विचारले. तेव्हा त्यांनी पत्रकारांच्या हातात एक पत्र दिले ते एका महिलेचे निनावे पत्र होते. दरम्यान ही बातमी करा असे काकांनी पत्रकारांना सांगितले.
पत्रकारांनी ते पत्र वाचले त्यानंतर सर्वांनी सीईओ यांची भेट घेतली निनावी पत्राबाबत विचारले असता आपण संबंधित अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारणा करणार आहे. त्यानंतर त्यांची सुधारणा झाली नाही तर संबंधित महिलेला काका साठे यांच्यासोबत बोलावून घेऊन तिचा जबाब घेणार आहे त्यानंतर पुढील कारवाई करू अशी माहिती स्वामी यांनी दिली.
दरम्यान हे पत्र होते एका गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात काय आहे त्या पत्रात वाचा….
स्वामी साहेब आपणांकडून मोठ्या अपेक्षाने अर्ज विनंती पाठविला होता. व शिक्षणाधिकारी लोहार यांना सांगून पण जमादार साहेब यांच्यात फरक पडला नाही. उलट त्यांनी माझ्या मुख्याध्यापकांमार्फत निरोप पाठविला. दिवालीची फराळ करायला मला घेवून या त्यांच्या घरी दिनांक ५/११/२२ किंवा ६/११/२२ रोजी घरी या त्यांच्या घरी कोणी नाही असे म्हणाले.
स्वामी साहेब १५/११/२२ पर्यंत आपण त्यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर मुख्यमंत्री १९/११/२२ रोजी सोलापूर दौरावर आहेत त्याच्या किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गाडीसमोर मी आत्मदहन करणार त्यांची गाडी अडविणार जबाबदार आपण व जमादार साहेब असेल विनंती करते.
जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता यांनाही विनंती करते की, मला जमादार साहेब ६ ते ७ महिने त्रास देत आहे, स्वामी साहेबाना व शिक्षणाधिकारी, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पत्र पाठविलेले आपणास पाठवत आहे. स्वामी साहेब त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांचे जमादार यांचे धाडस पुढे वाढले आहे. काका, आपण मला आपली कन्या म्हणून न्याय द्याल ही अपेक्षा करते.
दरम्यान या पत्रामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून यात संबंधित गटशिक्षणाधिकारी सुद्धा अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.





















