सोलापूर- पुरेशा प्रमाणात समभागाची रक्कम नाही, बँकेत ठेव नाही तसेच क्रियाशील सदस्य नाहीत अशा विविध कारणावरून सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सर्वसाधारण मतदारसंघातून बसवराज बगले, रतन रिक्के, धनंजय पुजारी, वैभव बरबडे यांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले. बगले यांचा सर्वसाधारण मतदारसंघाबरोबरच इतर मागास प्रवर्गातील अर्जही बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सांगितले.
सिध्देश्वर सहकारी बँकेसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. संचालकांच्या 15 पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 11 जागांसाठी 50 उमेदवारांचे अर्ज होते. याची छाननी सोमवारी झाली. छाननीत बगले, रिक्के, पुजारी व बरबडे यांच्यासह केदारनाथ उंबरजे यांच्या अर्जाला हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींचा विचार करून निवडणूक निर्णय अधिकार्यांनी उंबरजे वगळता इतर चौघांचे अर्ज बाद झाले. उंबरजे यांचा अर्ज मंजूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला.
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण मतदारसंघातील 10 जागांसाठी 22 उमेदवार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी 5 असे एकूण 27 उमेदवार आहेत. अर्ज माघारीसाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.





















