मंगळवेढा : करणी बाधा घालवितो, घरात भांडणे होवू देत नाही घरातील व जमीनीतील गुप्तधन सोने काढून देतो, होमहवण करतो असे म्हणून मंगळवेढ्यातील लोकांना गंडवणाऱ्या भोंदू महाराजासह त्यांच्या पुत्रास ही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी 12 तासात ही कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी दि. १४/११/२०२२ रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यास फिर्यादी मायाक्का रेवणसिद्ध मोटे रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा जि.सोलापूर यांनी आरोपी नामे महाराज भगवान उर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी व त्याचा मुलगा विरभर्द उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी दोघे रा. मालवंडी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी जुलै २०२२ ते आजतागायत या कालवधीत वरील दोघांनी फिर्यादीचे व फिर्यादीचे मयत पती रेवणसिद्ध तसेच गावातील मल्हारी म्हाळाप्पा करे, चेतन चंद्रकांत वाघमोडे, तानाजी बिरा सरग व सुशिलकुमार भिकू गवळी रा. जय भवानीनगर, मंगळवेढा असे सर्वाना त्यांची करणी बाधा घालवितो, घरात भांडणे होवू देत नाही घरातील व जमीनीतील गुप्तधन सोने काढून देतो, होमहवण करतो असे म्हणून होमहवण केले.
फिर्यादीचे पती रेवणसिध्द यांना काठीने पायावर, पाठीवर, जबर मारहाण करून फिर्यादीच्या पतीच्या डाव्या पायाचे हाड मोडून घरात धूप अंगारे जाळून फिर्यादीला व फिर्यादीच्या घरातील लोकांना पांढरी पावडर पाजून सर्वाकडून एकूण १३ लाख ४४ हजार ९०० रूपये रोख व फोन पे माध्यमातून घेवून फिर्यादींच्या त्याच्या सोबत असलेल्या लोकांची फसवणूक केली आहे. म्हणून सदर भोंदू महाराज व त्याचे सहकारी (पिता-पुत्रांना ) यांचे विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२६, ४२०, ३४ सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठा व आघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) (३), २ (१), ख ४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्हयातील आरोपी महाराज भगवान उर्फ सुदर्शन जगनाथ स्वामी व त्याचा मुलगा विरभद्र उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी दोघे रा. मालवंडी ता.बार्शी जि. सोलापूर यांच्या राहत्या घरी मंगळवेढा पोलीस ठाणे कडील तपास टिम पाठवून सदर दोन्ही आरोपीतांना दि. १४/११/२०२२ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्हयात अटक केलेली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास रणजीत माने पोलीस निरीक्षक, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील विशेष बाब म्हणजे यातील फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी आरोपीतांस तुम्ही इतके गुप्तधन जमीनीतून काढून देता, करणीबाधा घालविता तर तुम्ही स्वतः पत्राच्या घरात का राहता असे विचारले असता यातील भोंदू महाराज यांनी सदरचे गुप्तधनाचे सोने, दागिने हे तुमच्या भाग्यात असून ते माझ्या भाग्यात नाहीत असे म्हणून समोरील लोकांना फसविलेले आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोफौ अविनाश पाटील, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, पोकॉ राजू आवटे यांनी सदर गुन्हयाचे तपास कामी मदत केली आहे.


















