सोलापूर, दि.15: समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने 03 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात दिनांक 2 व 3 डिसेंबर 2022 रोजी या दिनानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांची बैठक एन.बी. अंधशाळा येथे घेण्यात आली. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या दिनांक 2 सप्टेंबर रोजी सर्व प्रकारातील 1200 खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रीडा स्पर्धा या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा असून या क्रीडा स्पर्धेमध्ये 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, तीन चाकी सायकल, सॉफ्ट बॉल, थ्रो बॉल, रनिंग, लॉंग जंप, आदी क्रीडा प्रकारचा समावेश असणार आहे. या क्रीडा प्रकारांमध्ये 6 ते 8, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 18 व 18 वर्षावरील दिव्यांग विद्यार्थी सहभागी होतील सदरच्या क्रीडा स्पर्धा या नेहरूनगर सोलापूर येथील आश्रम शाळेच्या मैदानावर संपन्न होणार आहेत.
दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून सदर प्रभात फेरीमध्ये दिव्यांग विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेषांमध्ये सहभागी होऊन जनजागृती करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये गोंधळ गीत, भारुड, नृत्य आविष्कार इत्यादीचे सादरीकरण होणार आहे. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे, आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
यंदा प्रथमच दिव्यांग शाळांमधील शिक्षकांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खमितकर यांनी दिली. या स्पर्धा 4 डिसेंबर रोजी घेण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.



















