सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर व मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन पुणे यांचे संयुक्त विदयमाने कॉर्बन क्रिडीट व वृक्ष लागवडबाबत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे सोमवारी कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेस ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे मिटकॉन नेचरचे व्यवस्थापकीय संचालक भगतसिंग शेळके, संचालक धवल मरपडे, माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सह्याद्री वनराई फाऊंडेशनचे तात्यासाहेब घोडगे, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल जोशी, मगारोहयो कक्षाकडील गट विकास अधिकारी रंजना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्बन क्रिडिट म्हणजे एखादया व्यवसायाला कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरीतगृह वायूचे उत्सर्जन करण्यासाठी परवानगी देणे. औद्योगिक क्रियाकलापामुळे ग्लोबल वार्मिंग अधीन असलेल्या पर्यावरणास मदत करण्यासाठी कार्बनडाइऑक्साईड उत्सर्जन कमी करणे हे कार्बन क्रेडीटचे उदिष्ट आहे. नियामक अधिकारी आणि सरकारने कंपन्यासाठी उत्सर्जन मर्यादा निश्चित केली आहे. कार्बन क्रेडिटसचा व्यवहार खाजगी आणि सार्वजनिक माध्यमातून केला जातो. महोगनी वृक्ष लागवड याबाबीचा फायदा ग्रामपंचायतीना कसा होता, कार्बन क्रिडीट, फळपिके विक्री व लाकूड निर्मिती संवर्धनातून कसा फायदा होतो त्याचे लागवड व संगोपनाबाबत मार्गदर्शन मिटकॉन मार्फत करण्यात आले.
तात्यासाहेब घोडगे यांनी त्यांचा गावात निर्माण केलेले धनवन त्याकरता त्यांना आलेल्या अडीअडचणीचे अनुभव कथन केले. त्यांनी लागवड केलेल्या रोपांच्या संगोपनातून मनरेगा अंतर्गत १९ कुटूंबांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला त्यातून गावाचा कसा कायापालट झाला याची माहिती त्यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थीच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर महागोनी, आंबा, चिंच या वृक्ष लागवडीचे कामे गट लागवड व विखुरलेल्या स्वरूपात करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या कार्यशाळेमुळे जिल्हयात मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीचे कामे मोठया प्रमाणात होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्रामपंचायती आर्थिकदृष्टा सक्षम होण्यासाठी व काळाची गरज ओळखून शुध्द हवा व वातावरणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावे समृध्द होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी केले.




















