सोलापूर : माजी पालकमंत्र्यांच्या तोंडी आदेशावरून सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृहातील दुरुस्तीचे काम निविदा न काढता करण्यात आले असून हा संगनमताने केलेला भ्रष्टाचार आहे त्याची व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करा अशी तक्रार काँग्रेसचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
लांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 मध्ये नविन कामाचे निविदा न काढता, जुने केलेल्या कामाची निविदा काढून संगनमताने बिले उचलण्याचा प्रकार सर्रास वाढला आहे. तसेच माजी पालकमंत्री यांच्या तोंडी आदेशावरून सदर काम केले जात आहे असे स्पष्टपणे संबंधीत अधिकारी म्हणतात. आम्ही याबाबत स्पष्टपणे माजी पालकमंत्री भरणे साहेबांना सदर प्रकरणी विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, याकामी आम्ही कधीही तोंडी आदेश देत नाही.
तसेच काही कामाचे आवश्यक नसताना जुने काम चांगले असताना त्याचेच निविदा काढून संगनमत करून 50 टक्के काम करून संपूर्ण 100 टक्के बिल उचलण्यात येतो. हा प्रकार सन 2021-2022 पासून सुरू असल्याचे ठेकेदार यांनी स्पष्ट व्यक्त करीत आहेत. तरी अशा भ्रष्ट कारभाराची खातेनिहाय चौकशी समिती नेमून अशा भ्रष्ट कामाला मदत करणारे, गैरमार्गाने अमाप संपत्ती गोळा करणे, अशा संबंधीत भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्याची चौकशी करावी तसेच सदरील अधिकारी व कर्मचारी हे कामास लागल्याच्या तारखेच्या अगोदर असलेली संपत्ती व सध्या असलेली संपत्तीची चौकशी इन्कमटॅक्स अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी.
तरी संबंधीत भ्रष्ट अधिकाऱ्यावर त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा सदर प्रकरणाबाबत पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहिल.