सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये मागील काही महिन्यात माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला. शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे महिन्यातून तीन आठवडे कार्यालयात नसल्याने आणि त्यांनी दिलेल्या बेकायदेशीर मान्यता प्रकरणांची मंत्रालय स्तरावर चौकशी सुरु आहे.
अशातच ते आता 15 दिवस रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांना देण्यात आला आहे. पदभार घेताच शिक्षणाधिकारी वठारे यांनी कार्यालयात पहिली शिस्त लावली ती म्हणजे एकाही शिक्षकाने शाळेच्या वेळेत कार्यालयात फिरकायचे नाही, मुख्याध्यापक आणि संबंधित शाळेतील लिपिक यांनीच आपली कामे घेऊन शिक्षणाधिकारी कार्यालयात यायचे. त्यासाठी त्यांनी कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावरच अभ्यागत रजिस्टर ठेवून नावे नोंदवून कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.
तसेच जिल्हा परिषद आवारात परस्पर फायली घेऊन फिरणारा शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचा वाहन चालक कार्यालयात फिरकताना दिसत नाही. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आवारात फिरण्यास बंदी घातली असून चहा वगैरे कार्यालयातच मागवण्यात यावा अशी तंबी दिली आहे.
त्याचबरोबर शनिवारी कार्यालय सुरू ठेवण्यात आले असून या दिवशी कार्यालयीन साफसफाई करण्यात आली. अभिलेख वर्गीकरण अपडेट करण्यात येत आहे. प्रलंबित असलेली पेन्शन प्रकरणे 55, प्रायव्हेट फंडाचे प्रकरणे 85, मेडिकल बिले 70 इतक्या फाईलीचा शनिवारी निपटारा करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी वठारे यांनी सांगितले.




















