भावूक दिलीप माने अन् चिडलेले कार्यकर्ते ; काँग्रेसचे शेले दिले रस्त्यावर फेकून
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दिवसभरात झालेल्या राजकीय घडामोडीने संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. त्याला कारणही तसेच होते.
काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली असताना सुद्धा ऐनवेळी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस पक्षाने ए बी फॉर्म न दिल्याने माजी आमदार दिलीप माने यांच्यावर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.
लाडक्या मालकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारो कार्यकर्ते होटगी रोडवरील सुमित्रा निवासस्थानी सकाळी नऊ वाजल्यापासून गर्दी केले होते. दुपारी दीड वाजले तरीही कार्यकर्ते त्याच ठिकाणी थांबून होते. मालक बाहेर का येत नाहीत? नेमके आत काय घडत होते हे त्यांना समजू शकले नाही.
शेवटी दुपारी दीड नंतर मालक रॅली मध्ये सहभागी झाले. वाजत गाजत उत्साही आणि जल्लोषी वातावरणात ही रॅली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळ आली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सगळीकडे गळ्यात काँग्रेसचे सगे, डोक्यावर काँग्रेसचे टोपी घालून कार्यकर्ते पाहायला मिळाले अशी गर्दी या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायला पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
दिलीप माने हे तब्बल तीन तास निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी होते. तरीही तेवढीच गर्दी बाहेर थांबून होती प्रत्येक जण विचारत होते मालकांना काँग्रेसचा ए बी फॉर्म मिळाला का नाही.
साधारण पाच सव्वा पाच च्या सुमारास दिलीप माने हे कार्यालयाबाहेर आले या ठिकाणी उपस्थित मीडियाने त्यांना घेराव घातला नेमके काय झाले हे प्रत्येक मीडियाला सुद्धा जाणून घ्यायचे होते त्याच वेळेस दिलीप माने यांनी आपणाला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून आपण अपक्ष उमेदवार अर्ज भरला असे सांगत काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना दिलीप माने हे भावूक झाले होते. समोर शेकडो कार्यकर्ते त्यांच्याबाबत घोषणा देत होते.
मालकांचा चेहरा पाहून कार्यकर्ते चिडल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा मालकांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही हे समजले, तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या गळ्यातील काँग्रेसचा शेला डोक्यावरची काँग्रेसची टोपी काढून रस्त्यावर फेकून दिल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले.