सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात विनापरवानगी गैर कायद्याची मंडळी जमवून जनावरे आणून बांधल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह सहा जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार शब्बीर तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, शहराध्यक्ष जमीर शेख, मुजाहिद रमजान सय्यद, मुस्तफा जाकीर हुसेन रचभरे, मोहसीन नजीर तांबोळी, अकिब नाईकवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे आहेत.
मंद्रूप येथील एमआयडीसीमध्ये शेत जमीन गेलेल्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू होते गुरुवारी या आंदोलनात प्रहार संघटनेने उडी घेतली. काही शेतकऱ्यांसह जनावरे घेऊन संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि थेट जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात नेली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेठीस तर धरलेच मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.





















