सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवसाच्या ट्रेनिंग साठी लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी मसूरी या ठिकाणी जाणार असल्याने त्यांचा पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिला जाणार आहे तसे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दुपारी काढले.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्यासह राज्यातील 29 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा आदेश मंगळवारी सकाळच्या सुमारास निघाला त्यानंतर दुपारच्या सुमारास पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश निघाला. त्या आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवार 16 डिसेंबर रोजी आपला पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे हे मसुरीला ट्रेनिंगसाठी जाऊन आल्यानंतर काही दिवसात त्यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. दिलीप स्वामी हे ट्रेनिंग वरून आल्यानंतर त्यांनाही पुढील पोस्टिंग दिली जाऊ शकते.


















