सोलापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी व सत्ताधारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे बेताल वक्तव्य आणि महापुरुषांचा वारंवार होणारा अवमान त्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार 16 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदमध्ये सर्व बाजारपेठा व्यापारी यांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मध्यवर्ती महामंडळाकडून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्यास विनंती करण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोलापूर शहरातील मधला मारुती, नवी पेठ, बेगम पेठ तसेच मार्केट यार्ड मधील लिलाव व बाजार समितीचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद दिसून आले.
तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून महापुरुषांचा अभिवादन करण्यासाठी थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहेत. मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या अभिवादन रॅलीत उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना, एमआयएम, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, संभाजी आरमार, संभाजी ब्रिगेड असा सुमारे चार ते पाच हजारांचा समुदाय या मोर्चात सहभागी झाला आहे.



















