बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी
सोलापूर : दक्षिण तालुका मतदारसंघातील होटगी रोडवरील प्रमुख रस्त्यापैकी एक असलेला होटगी रोड ते इंगळगीपर्यंत 34 कि.मी. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामास राज्य सरकारकडून हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल प्रोग्राम (हॅम) अंतर्गत 224 कोटी रूपये राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये होटगी रोड (महिला हॉस्पिटल) ते होटगी स्टेशन पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण होणार आहे आणि त्यापुढील रस्ता दुपदरी सह संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर शहरातील आसरा चौक भागाबरोबरच होटगी – होटगी स्टेशन -औज (आ.) – इंगळगी आदी महत्वाची व वर्दळीची गावे आहेत. या रस्त्याचे काम झाल्यास होटगी आणि परिसरातील गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.
अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुका ते कर्नाटक राज्य या मार्गावरील वाहतुकीचा प्रवास वेळ आणि अंतर कमी होणार आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरातील एन.टी.पी.सी., साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी तसेच दक्षिण सोलापूर येथील चार ते पाच सिमेंट कारखान्यांना सिमेंटचा कच्चा माल कर्नाटकमधून, आंध्र येथून आणण्यासाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले असून यासाठी 224 कोटींची मंजुरी मिळाली आहे. याचे लवकर काम सुरू होणार आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यासह जुने आणि जीर्ण झालेले रस्त्यांची पुनर्बांधणी करणे, आवश्यक ठिकाणी लहान पूल बांधणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे.
परिसरातील विकासाला चालना मिळेलः आ. देशमुख
रस्त्याचा विकास झाल्यास भोवतालच्या परिसरातील पर्यटन व शेती मालाची वाहतूक वाढीसह या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे खासकरून होटगी आणि परिसराचा विकास साधणे शक्य होईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.