दक्षिण सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे हे निंबर्गी गावच्या सरपंच निवडणूकीत विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप पुरस्कृत चन्नप्पा बोरगी यांचा 181 मतांनी पराभव केल्याची माहिती मिळत आहे.
निंबर्गी मध्ये हसापुरे-बिराजदार-पाटील गट या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच एकत्र आले. राज्याचे माजी सहकारमंत्री तथा दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची होती.
सरपंच पदासाठी 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यात चन्नप्पा बोरगी, श्रीदीप हसापुरे, त्यांचे चुलते रमेश हसापुरे, पत्रकार आप्पासाहेब हत्ताळे, शेख हुसेनी सय्यद, अशपाक मुल्ला यांचा समावेश होता. त्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 5 जणांनी माघार घेतली. शेवटच्या क्षणी पुतण्या श्रीदीप साठी रमेश हसापुरे यांनी माघार घेतली. पत्रकार हत्ताळे यांनी ही माघार घेत प्रभाग 1 मध्ये आपला अर्ज त्यांनी ठेवला होता. त्यामुळे ही लढत सरळसरळ दुरंगी झाली. सुरेश हसापुरे मुलासाठी निंबर्गी मध्ये तळ ठोकून होते. भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी निंबर्गीत सभा घेतल्या होत्या. अखेर या निवडणुकीत श्रीदीप हसापुरे यांनी बाजी मारली.
या विजयात पॅनल प्रमुख गंगाधर बिराजदार यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. निकाल जाहीर होताच नार्थकोट प्रशालेच्या बाहेर हसापुरे समर्थकांनी एकच जल्लोष केला, आली रे आली कपबशी आली अशी घोषणाबाजी केली. हसापुरे बंधू रमेश हसापुरे यांनी श्रीदीप विजयी झाल्याची माहिती दिली..




















