सोलापूर दि. नामदेवराव (बापू) भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव भालशंकर यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त ज्ञानवंत प्रज्ञावंत, शीलवंत गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणारे हुशार, होतकरू आणि गरजु तसेच निराधार विद्याथ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ रविवार दि. २५ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता इंदिरा सभागृह, इंदिरा नगर, विजापूर रोड, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरणाचे हे ९ वे वर्ष आहे.
यावषीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी : सातारा जिल्हयाचे माजी पोलीस उपआयुक्त आबासाहेब दैठणकर, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले अशोक दिलपाक यांची निवड करण्यात आलेली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श प्रशासक पुरस्कारासाठी राजषी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील सहाय्यक प्राध्यापिका सिमा सरवदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रेरणा पत्रकार पुरस्कारासाठी बहुजन आवाज न्यूज चॅनलचे उपसंपादक विजयकुमार लोंढे, लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी नारायण घंटे यांची निवड करण्यात आलेली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी विश्वभूषण विद्यालय सोलापूर येथील सहशिक्षक प्रविण पाटील यांची तर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार लालबहादूर शास्त्री प्रशाला, सोलापूर येथील वासंती पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.
तसेच सम्यक ॲकॅडमीच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात. त्यांच्यावतीने घेण्यात आलेल्या संविधान गौरव परिक्षेतील पात्रधारक स्पर्धकांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे.
याच समारंभात मातोश्री रुक्मिणी फाऊंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीने जिल्हयातील अनाथ, निराधार, गरजु विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा ( एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी) देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, मुंबई येथील राज्यकर निरीक्षक बुध्दजय भालशंकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, जैनगुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरचे प्राचार्य आशुतोष शहा इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




















