सोलापूर : जिल्हा परिषदेचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास पदभार स्वीकारला. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची सातारा येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदी बदली झाली आहे. चंचल पाटील यांनीही शनिवारी पदभार सोडला.
कोहिनकर यांनी पदभार घेतात सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे जिल्हा परिषदेमध्ये स्वागत केले जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले.
दरम्यान पत्रकारांनी स्वागत केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व कामे वेळेवर कशी पूर्ण होतील यावर माझा भर राहणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा सेस फंड कशा पद्धतीने वाढवता येईल यावरही आपला फोकस राहील असेही ते म्हणाले.
कोहिनकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक आणि पुणे येथे गटविकास अधिकारी या पदावर काम केले आहे.
तसेच पुणे जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम केले असून त्यानंतर ते अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर प्रमोशनने ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर जॉईन झाले आहेत.





















