विद्यार्थीनींनों, तुमच्यासोबत चुकीचे घडल्यास लगेच पालक आणि शिक्षकांना सांगा ; पीआय संगीता पाटील यांचा सल्ला
मागील काही दिवसापासून महिलांवरील तसेच मुलीं वरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता पोलीस दलातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे व त्याचाच एक भाग म्हणून भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे विजापूर रोड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे स्वागत केले. व महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना या मन सुन्न करणाऱ्या असून त्यासाठी सर्व स्तरातून चिंतन होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना परत घडणार नाही असे आपले मत विशद केले.
पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अजूनही भारतामध्ये स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांच्या मानाने कमी असून यामुळेच स्त्रियांचा आर्थिक व सामाजिक स्थर सुधारला नसल्याचे सांगितले. हा स्तर जर सुधारायचा असेल तर शिक्षणाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेतेसाठी विविध कायदे उपलब्ध आहेत परंतु महिलांमध्ये या कायद्याविषयी जागृती नसल्यामुळेच महिला व विद्यार्थिनीवर अत्याचाराचे गुन्हे घडत असल्याचे मत मांडले.
महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये एखादी चुकीची घटना घडल्यास विद्यार्थिनींनी लगेच आपल्या शिक्षकांना व पालकांना त्याची माहिती करून देणे गरजेचे असल्याने त्यांनी सांगत जेणेकरून त्याला आळा घालता येईल असे मत मांडले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी केले. यावेळेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.