प्रणिती शिंदे कडाडल्या ! ‘हे वरून शोबाज आतून पोकळ सरकार’ ; छत्रपतींचा पुतळा कोसळल्याचा सोलापुरात निषेध
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद सोलापुरात ही उमटले. बुधवारी जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एकत्रित येऊन कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. या घटनेने आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामाची मागणी केली. पदाधिकारी यांनी आपल्या भाषणातून तीन पक्षाच्या सरकारवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावरून हे सरकार वरून केवळ शोबाज आहे आणि आतून टोटली पोकळ असल्याचे टीका त्यांनी केली. त्यामुळे त्यांच्या आता कोणत्याही योजना चालणार नाहीत जनतेच्या लक्षात आलेले आहे हे सरकार आता महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही या शब्दात त्यांनी महायुतीच्या सरकारवर तोफ डागली. पहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे…..
या आंदोलनात काँग्रेसचे चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल, शिवसेनेचे विष्णू कारमपुरी या तीन शहराध्यक्षांसह त्यांचे विविध पदाधिकारी माजी नगरसेवक विविध सेलचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.