धक्कादायक ! उजनी धरणाच्या पाण्यात प्रवाशी बोट बुडाली, सहा जण बुडाले, रात्रभर शोधकार्य सुरूच
सोलापूर : उजनी धरणात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशी वाहतूक करणारी बोट(लॉंच)उलटली आहे, बोट मधून कुगाव ते कळाशी असा प्रवास करणाऱ्या सहा जण बुडाले आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एक प्रवाशी पोहून बाहेर आला आहे. वाचलेल्या प्रवाशाने ही माहिती दिली आहे. त्याला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन बोट मधील प्रवाशांचा मंगळवारी सायंकाळ पासून उजनी धरणात शोध घेत आहेत. अद्याप एकही मृतदेह सापडला नाही. गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.या बोटीत एक तरुण पोलिस उपनिरीक्षक होता. राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
सोलापूर आणि पुणे जिल्ह्या मध्ये असलेल्या उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा जि सोलापूर) ते कळाशी (ता. इंदापूर जि पुणे) या दरम्यान मंगळवारी सायंकाळी प्रवाशी बोट उलटली आहे. वादळी वारा आल्याने प्रवासी बोट हेलकावे खात उलटली आहे दुर्घटनेत झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले आहेत. बोट मधील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याने ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्या नंतर घटना उघडकीस आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे जात होती. बोट मध्ये कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. बोट धरणातुन इंदापूर कडे जाताना जोरदार वादळी वारा सुटला. वाऱ्यामुळे बोट हेलकावे खात पाण्यात उलटली. कुगाव(ता करमाळा,जि सोलापूर) ते कळाशी(ता इंदापूर,जि सोलापूर) दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली.