धक्कादायक : नई जिंदगी येथे करंट लागून महिलेचा मृत्यू ; सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी
सोलापूर : पाण्याच्या नळाला मोटर लावताना करंट लागून 40 वर्षे महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना सोलापुरातील नई जिंदगी भागातील शिवगंगा नगरात गुरुवारी दुपारी घडली.
तस्लिम महेबुब शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. सोलापूर मध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येते. त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटर लावून पाणी ओढतात. सोलापुरात मोटार लावताना विजेचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काँग्रेसच्या आमदार तथा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या एका सभेमध्ये याबाबत उल्लेख करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.
मंगळवारी लोकसभेचे मतदान संपले आणि गुरुवारी लगेच ही घटना घडली. त्यामुळे नई जिंदगी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळतात या भागाची माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, रफीक इनामदार यांनी तातडीने सिव्हील हॉस्पिटल मध्ये भेट दिली आहे. सिव्हील हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांची गर्दी झाली आहे.