एमआयएमची मीना बाजारात इफ्तार पार्टी ;फारूक शाब्दीनी स्वतः केले सरबत
सोलापूर : एमआयएम पक्ष आणि फारूक शाब्दी यांच्या पुढाकाराने दरवर्षी सोलापूर शहरात इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात येते. यंदा देखील विजापूर वेस येथील मीना बाजार मध्ये एमआयएमची इफ्तार पार्टी मोठ्या आनंदाने संपन्न झाली. एमआयएमचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले होते.
रमजान मासाच्या शेवटच्या उपवासाला जंगी इफ्तार पार्टी झाली. फारूक शाब्दी यांनी स्वतः सरबत तयार करून उपवासधारकांना दिले. शाब्दीच्या साधेपणामुळे सर्व समाजातील नागरिक भावुक झाले होते. पार्टी मधील वरीष्ठ नेते स्वतः सरबत तयार करतात, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगत नाहीत किंवा कमीपणा लेखत नाहीत अशी चर्चा ऐकण्यास मिळाली.
मीना बाजाराला ऐतिहासिक परंपरा आहे. मुघल काळापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस येथे मीना बाजार भरतो. रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरीक खरेदीसाठी मीना बाजारात दाखल होतात. मोठी गर्दी मीना बाजारात दाखल होत असते. अशा गर्दीत उपवास ठेवलेल्या मुस्लिम भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यांची खरेदी सुखहर व्हावी यासाठी प्रत्येक सोलापूरकर प्रयत्न करत असतो.
एमआयएमचे फारूक शाब्दी यांनी देखील बुधवारी सायंकाळी जंगी इफ्तार पार्टी मीना बाजारात आयोजित केली होती. बाहेरून आलेल्यासाठी आणि सर्व उपवास धारकांना फळं,थंड पेय,अल्पोपहार इफ्तार पार्टीत वितरित करण्यात आले. इफ्तार पार्टीत उपवास म्हणजेच रोजा सोडलेल्या भाविकांची मन जिंकून त्यांना तृप्त करण्यात एमआयएमने पुढाकार घेतला.