सोलापूर : विद्युत डीपी चालु केल्यापासून ते आज पावेतो विज वापरल्याची कोणतीही कारवाई न करण्याकरीता १५ हजार रुपये लाच घेणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सुमित गुलाबराव साबळे, वय २७ वर्ष व्यवसाय नोकरी पद कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि. शाखा कार्यालय सदाशिव नगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतंत्र वैयक्तीक डी.पी बसविला असुन त्यास दि २५ मार्च २०२२ रोजी म.रा.वि.वि.कं.लि. कार्यालय सदाशिव नगर यांचेकडुन चार्जिंग परवानगी मिळाली असुन तेव्हापासून सदर डी.पी चालु झालेला होता. परंतु त्यास कोणतेही मिटर बसविलेले नसल्याने तक्रारदार यांना सदर डीपीचेच अदयाप पावेतो कोणतेही विदयुत विल आलेले नव्हते. परिणामी तक्रारदार यांचे डी.पी चा विदयुत पुरवठा बंद करण्यात आलेला होता.
यातील आरोपी सावळे यांनी सदर विदयुत डी.पीस नविन मिटर बसविण्यास सांगुन मिटर बसविल्यानंतर यापुढे तक्रारदार यांना स्वतंत्र बिल येईल असे सांगितले व डी.पी चालु केल्यापासून ते आज पावेतो विज वापरल्याची कोणतीही कारवाई न करण्याकरीता १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असतांना आरोपी साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार घाडगे, सण्णके, किणगी, उडाणशिव सर्व नेमणूक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.



















