निमगाव तालुका माळशिरस येथील शाळेपासून सुरु झालेला ‘सायकल बँक’ हा उपक्रम अतिशय चांगल्या पध्दतीने जिल्ह्याभरात सुरु आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सीईओ स्वामी हे निमगाव ता. माळशिरस येथे गेल्यानंतर निमगावच्या शाळेत पन्नास मुली ह्या केवळ सायकल नाही म्हणून शिक्षण सोडून घरी बसल्या होत्या. हे लक्षात येताच सीईओ स्वामी यांनी सायकल बॅंकेची संकल्पना मांडली आणि स्वतः दोन सायकली भेट देत असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे लोक वर्गणीच्या माध्यमातून सायकली जमवून या मुलींना सायकली देण्याबाबत आवाहन केले.त्यातूनच सायकल बँकेचा जन्म झाला. काही दिवसांतच निमगावच्या शाळेत पन्नास सायकलींची सायकल बॅंक तयार झाली.
यापुढे जाऊन संपूर्ण जिल्हाभरात अशा किती मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश सीईओ स्वामी यांनी शिक्षण विभागास दिले. जिल्हाभरात सुमारे 6000 पेक्षा जास्त मुली घरापासून शाळा लांब आहे आणि शाळेत जाण्यासाठी सायकल नाही म्हणून शाळा सोडत असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
तद्नंतर सीईओ स्वामी यांनी राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर “एक सायकल बहिणीसाठी” ही संकल्पना सायकल बॅंकेसाठी मांडली, आणि जिल्हाभरात सुरू झाली एक चळवळ.
सीईओ स्वामींच्या या सायकल बॅंक चळवळीत जिल्हा परिषदेचे विविध विभाग तसेच दानशूर नागरिक तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक उद्योग समूह सहभाग नोंदवत आहेत.
याच पार्श्वभूमीवर दैनिक सकाळ समुहाने आपला वाटा उचलत सायकल बॅंकेसाठी सहाय्य करण्याचे जाहीर केले. आज मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर केंद्रातील उजनी वसाहत येथे सकाळ उद्योग समूहातर्फे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर रक्षाबंधन निमित्त “एक सायकल बहिणीसाठी” या उपक्रम अंतर्गत 11 सायकल सकाळ उद्योग समूह तर्फे मुलींना भेट देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वि सातपुते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवानजी, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत आदी उपस्थित होते.



















