यातील मयत रेमा दुपारगुडे हिचा विवाह संजय सोनकांबळे रा. निमगाव ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांच्याशी दि. 14/4/2012 रोजी झालेला होता. सदर लग्नात मयत रेश्मा हिच्या आई-वडिलांनी आरोपी नवरा संजय सोनकांबळे यास सोनेनाणे, कपडेलत्ते देऊन लग्न लावून दिलेले होते.
लग्नानंतर आरोपी नवरा संजय, सासू शांताबाई, नणंद विजयश्री व तिचा पती संजय जगताप यांनी लग्नामध्ये मयत रेश्मा हिच्या आई-वडिलांनी मानपान केला नाही, ठरल्याप्रमाणे हुंडा दिला नाही, तो घेऊन ये, म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. बऱ्याच वेळा बैठका होऊन देखील आरोपींच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.
अचानकपणे दि. १८/८/२०१५ रोजी रेश्मा ही मयत झाल्याचा निरोप तिचे आई-वडिलांना मिळाला व ते तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. आरोपींकडे जाऊन चौकशी केली असता, मयताच्या पोटात रात्री दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणले असून ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर रेश्माच्या आई-वडिलांना मयत रेश्माच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने आरोपींनी रेश्मा हिस हुंड्यासाठी छळ करून विषारी औषध पाजून मारले असल्याचे खात्री झाल्याने मयताचे वडील दामू हनुमंत दुपारगुडे यांनी आरोपी नवरा संजय, सासू शांताबाई, नणंद विजयश्री व तिचा पती संजय जगताप यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि कलम ४९८(अ), ५०४(ब), ३४ सह व हुंडा प्रतिबंधक कायदाचे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या तपास करून अक्कलकोट उत्तर पोलिसांनी में. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात ॲड निलेश जोशी यांनी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण तफावती व विसंगती दाखवून दिल्या, तसेच मयत रेश्मा हिचा मृत्यू अनैसर्गिक असल्याबाबत देखील सरकार पक्षाने ठोस पुरावा न्यायालयात सादर केलेला नाही व आरोपींनी हुंड्यासाठी मयताचा छळ केलाबाबतचा सबळ पुरावा में. न्यायालयात आलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
आरोपींच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते मॅडम यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओकार परदेशी यांनी काम पाहिले.




















