सोलापूर : सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील सात ते आठ चंदनाची झाडे तोडण्यात आली आहेत. चंदनासोबत इतर ही अनेक झाडे तोडण्यात आली असून याला महापालिका अथवा वन विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. ‘सिंहासन’ने सर्वात प्रथम ही बातमी लावताच सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागाचे अधीक्षक रोहित माने यांनी पाहणी केली.
कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान रोहित माने यांनी शासकीय विश्रामगृहातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासंदर्भात चौकशी केली. अधिक माहिती घेतली. नेमकी किती झाडे तोडले आहेत, हेही पाहिले. मात्र या संदर्भात शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांची उत्तरे समाधानकारक मिळाली नसल्याचे त्यांना दिसून आले.
त्यांच्या पाहणीत एक चंदनाचे झाड पूर्णपणे छाटले आहे. त्याचबरोबर तीन ते चार इतर झाडे तोडण्यात आले आहेत. इतर चार ते पाच झाडांमध्ये कडुलिंब व चाफा, फुलांच्या झाडांचा समावेश आहे. चौकशी चालू असून लवकरच या संदर्भातील अहवाल महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
सहाय्यक अभियंता तथा विश्रामगृह व्यवस्थापक लोखंडे यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी आड येणाऱ्या फांद्या व झाडे तोडली असल्याचे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले.
झाडे तोडून तीन दिवस झाले अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. उद्यान विभाग कार्यवाही का करीत नाही. आता माध्यमांतुन संशय व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही बसवणारा मक्तेदार कुलाल यांच्यासह व्यवस्थापक लोखंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमीं मधून होत आहे.


















