सोलापूर : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील 28 गावांनी कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही या गावांनी संमत केला आहे.
आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आम्हाला नीटनिटके रस्ते देखील मिळालेले नाहीत. सातत्याने आम्हाला डावलले जात आहे, अशा भावना या गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. यापैकी काही गावात कर्नाटकचे झेंडेही फडकले.
दरम्यान राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे हे गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या विषयावर प्रतिक्रिया विचारली.
त्यावर त्यांनी सीमावर्तीय भागातील नागरिकांच्या भूमिकेवर चांगलाच संताप व्यक्त केला. अलमट्टीच पाणी सातत्याने महाराष्ट्राला त्रास देतयं. आम्ही सहन करतोय, सख्खे भाऊ पक्के वैरी असल्याचे भासवताहेत. कधी नांदेड बॉर्डर, कधी अक्कलकोट बॉर्डर तर कधी जत बॉर्डर उठून उभे राहते. ‘आमचं पाणी द्या नाहीतर आम्ही महाराष्ट्र सोडून जाऊ’ मात्र एवढा महाराष्ट्र लेचापेचा नाही.
यशवंतराव चव्हाण पासून अनेक मान्यवरांनी या मराठी भूमीची सेवा केली आहे. या मातृभूमीला लाथाडून आम्ही जातो असे म्हणताय जावा, पण त्याची जाहिरात बाजी करू नका, आईवर हात उगारू नका अशी विनंती ढोबळे यांनी व्यक्त केली.


















