सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे नवनव्या संकल्पनेचे शिल्पकार मानले जातात. भले तो आरोग्य असेल, शिक्षण असेल, बालकल्याण असेल की ग्रामपंचायत नव्या संकल्पना, उपक्रम राबवून जिल्हा परिषदेचा आलेख हलता ठेवतात. ज्या गावात कोरोना रुग्ण नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा पहिला प्रस्ताव राज्यामध्ये सीईओ दिलीप स्वामी यांनीच पाठवला होता. माझे गाव कोरोनामुक्त गाव हा उपक्रम राज्य सरकारने अवलंबला ही सोलापूर साठी गौरवाची बाब होती.
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद व शिक्षण चालू होते मात्र यामध्ये स्वामींनी “स्वच्छ शाळा,सुंदर शाळा” या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे पालटले, यात लोकसहभाग घेतला, आवाहन केले, शिक्षकांनी सुद्धा यात झोकून देऊन काम केले, एक नाय दोन नाय तर तब्बल 4 कोटींचा निधी लोकसहभागातून जमा झाला, आणि आज शाळांचे चित्र बदलले. विद्यार्थ्यांना ही विश्वास बसणार नाही अशा शाळा स्वच्छ आणि सुंदर झाल्या आहेत.
एवढ्यावर गप्प बसतील ते दिलीप स्वामी कसले, त्यांना आणखी नवी संकल्पना सुचली, आपली शाळा व विद्यार्थ्यांबद्दल आता शिक्षकांच्या डोक्यात काय चाललंय हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांनी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे, शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांसाठी ही स्पर्धा असणार आहे. ही संकल्पना सीईओ स्वामी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पदाधिकारी व सदस्यांसमोर बोलून दाखवली तसेच सोमवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली.
शिक्षकांसाठी विषय असणार आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मी काय करू शकतो….., मुख्याध्यापक यांच्यासाठी शाळेच्या विकासासाठी मी काय करू शकतो….आणि केंद्र प्रमुखांसाठी माझ्या केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मी काय करू शकतो….,असे तीन वेगळे विषय असणार आहेत.
ही संकल्पना राबविण्यामागील उद्देश सांगताना त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून नवे प्रयोग,नव्या संकल्पना, नवीन विषय जिल्ह्याला मिळतील. आणि विशेष म्हणजे शाळा स्वच्छ व सुंदर झाल्या त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील 5 वी ते 10 वी च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याचा अतिशय आनंद होत असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

















