सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा या महापालिका हद्दवाढ भागामध्ये आल्याने त्या महापालिकेकडे हस्तांतर कराव्यात अशी मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशासक असल्याने त्यांनी निर्णय घेऊन हस्तांतरण कराव्या अशा सूचना केल्या. यानंतर महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या महापालिकेकडे घेणारच त्यासाठी आपण जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करणार असे सांगितले होते.
याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रशासक तथा सीईओ स्वामी यांच्याकडे विचारणा केली असता, जिल्हा परिषदेच्या दोन सर्वसाधारण सभेमध्ये शाळा हस्तांतर करण्याला विरोध दर्शवणारा ठराव झालेला आहे. झेडपीच्या मालकीची ही मालमत्ता आहे आणि हा खूप मोठा विषय आहे, यावर मला निर्णय घेता येणार नाही, त्यासाठी शासनाकडे आपण याप्रकरणी निर्णय घ्यावा असा प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगताना केवळ सोलापूर जिल्ह्याचाच हा विषय नसून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हद्दवाढ झाली तिथल्याही शाळांचा विषय असल्याने शासनाला हा राज्यस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे असे सांगितले. त्यामुळे महापालिका आयुक्त शिवशंकर यांच्या वक्तव्याला महत्त्व उरले नाही.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना रजेवर जाण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. त्यानुसार सीईओ स्वामी यांनी कोळी यांच्याकडून रजेचा अर्ज घेऊन त्यांना रजेवर पाठवले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन योजनेच्या टेंडर प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. कोळी यांचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याकडे देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली असता अद्याप मला चार्ज देण्याबाबतचे पत्र मिळाले नाही असे सांगितले आहे.


















