सोलापूर – राज्यात 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पासून सोलापूर जिल्ह्याला गेटकेन पालकमंत्री मिळाला आहे. सुरुवातीला दिलीप वळसे पाटील (#Dilip_walse_patil) ते केवळ तीन महिन्यातच गेले, कोरोना आला वयोमानानुसार त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री पद सोडले, त्यानंतर आले जितेंद्र आव्हाड (#Jitendra_Awhad) त्यांनी एक दौरा केला आणि त्यांना कोरोना झाला. त्याचं सुदधा पालकमंत्री पद गेलं.
आता द्यायचे कुणाला असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. शेवटी सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या इंदापूर तालुक्याचे आमदार राज्यमंत्री व धनगर समाजाचे एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे (#Dattatray_Bharane) यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले. जरी गेटकेन असले तरी मामांनी सलग दोन सव्वा दोन वर्ष कोरोनाच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये सोलापुरात आपले कामकाज केले, आपल्या स्वभावाने तसेच बोलण्यातील गोडव्याने त्यांनी प्रशासनाकडून काम करुन घेतले. सहसा कुणावरही कडक कारवाई त्यांनी केली नाही. जसे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी मामा होते तसेच ते प्रशासनातही मामा बनून राहीले. पालकमंत्र्यांच्या स्वभावाचाही अधिकाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचं पहायला मिळालं. बऱ्याच विभागाचे अधिकारी मुजोर झाले.
बरोबर अडीच वर्षाने सरकार बदलले. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्याला अनुभवी, अभ्यासू आणि आक्रमक समजले जाणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (#Radhakrushna_Vikhe_Patil) पालकमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांचा कार्यकाळ किती असेल हे जरी नक्की नसले तरी त्यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजनसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर आपला दरारा आणि छाप सोडली आहे. सोलापूर जिल्ह्यात मला किती अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल असा दम त्यांनी भरला त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रकरणात त्यांनी संबधित कार्यकारी अभियंत्याला सरळ सरळ रजेवर पाठवले आहे. आणि त्याची चार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी लावली. त्यानंतर आजपर्यंत कधीच ज्या अधिकाऱ्याचा कधीच विषय झाला नाही अशा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना चांगलेच पळवले. एकाच वेळी इतके प्रश्न विचारले की, त्यांना उत्तर देतादेता ते घामेघुम झाले. त्यांच्या तक्रारी व कामचुकारपणा पाहून सर्व आमदारांच्या मार्फत त्यांच्या कामकाजाची चौकशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले, रस्त्याची डागडुजी करता तसे उत्तरे देऊ नका या शब्दात खरडपट्टी केली. जिल्हा भुमी अभिलेख अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन सभेत खडे बोल सूनावत “आमदारांची ही शेवटची तक्रार असे समजायचे, परत तक्रार आली तर मी ॲक्शन घेईन थोडीशी काळजी घ्या” पालकमंत्री विखे पाटील यांचे हे शब्द बरेच काही सांगून गेले. याचवेळी अनेकांमधून सोलापूर जिल्ह्याला प्रथमच “नायक” पालकमंत्री मिळाल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.


















