सोलापूर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव ता. दक्षिण सोलापूर येथे सीईओ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. सीईओ स्वामी म्हणाले की आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग सातत्याने माता मृत्यू, बालमृत्यू, लिंग निदान प्रतिबंध याबाबत काम करीत आहेत. शासनाने याबाबत अनेक कायदेही केले आहेत. परंतु नुसते व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगून व कायदे करून या सामाजिक समस्या सुटणार नाहीत तर समाजात याबाबत जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. या उद्देशानेच ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांसह गाव करभार करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वामी यांनी केले.
यावेळी शालेय मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. गरोदर माता व स्तनदा माता यांना पोषण आहारचे महत्व पटवून देण्यात आले. बचतगटांनी तयार केलेल्या पोषण आहार प्रदर्शनातून माहिती देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत जन्म दाखले व आठ अ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. दिनांक 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या प्राची संजय आठवले हीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बगाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ नलवडे व प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत 134 तीस वर्षावरील महिलांची असंसर्गिक आजाराची तपासणी तसेच 41 गरोदर मातांची नियमित तपासणी करण्यात आली. किशोरवयीन मुलींना आहाराचे व पोषणाचे महत्व विशद करण्यात आले. तसेच त्यांच्याही तपासण्या करण्यात आल्या.



















