सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या महिला सरपंच जैतूनबी शेख (वय 65 वर्ष) या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे मिसिंग झाल्याची फिर्याद मुलगा सरदार शेख यांनी दिली आहे. बुधवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारून येते असे सांगून शेतात गेल्या होत्या. मात्र शेळ्या परत आल्या पण 65 वर्षीय महिला सरपंच जैतूनबी शेख या घरी परत आल्या नाही. कुटुंबातील दोन्ही मुलं, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी शोध घेतला. पण त्या कुठेही आढळून आल्या नाहीत.
ग्रामस्थांनी देखील आजूबाजूच्या शेतात व इतर ठिकाणी महिला सरपंच जैतूनबी शेख यांची माहिती घेतली, अखेर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली. कवठे गावात बुधवारी सरपंच भाभी अचानक बेपत्ता झाल्याने गाव परिसरात ही एकच चर्चा आहे.
गावालगत व शेताजवळच्या सर्व विहिरी, पाहुणे, इतर गावे व सभोवताल गावकऱ्यांनी पिंजून काढला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून शक्य तेवढ्या ठिकाणी पाठविले आहे. शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने ग्रामस्थांनी जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे. पण शोध लागला नसल्याचे मुलगा सरदारने सांगितले.
सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रुक हे आपल्या फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. ज्या शेतात सरपंच भाभी शेळ्या राखायला गेल्या होत्या त्याठिकाणी जाऊन शोध सुरु केला.गावातील प्रत्येक नागरिकाचा कसून तपास केला. सापडलेल्या एका चप्पली वरुन डॉग स्क्वाडला पाचारण केले. त्याला चपलीचा वास दाखवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण डॉग शेतात काही अंतरावर जाऊन घुटमळले.
सरपंच भाभी जैतून शेख यांचे पती उस्मान शेख, मुलगा सरदार शेख यांची देखील विचारपूस केली. राजकिय लोकांसोबत भांडण, किंवा तक्रार झाली होती सविस्तर माहिती घेतली. पण पोलिसांच्या हाती अजून धागा लागला नाही. पण लवकरच सर्व माहिती समोर येईल अशीही चर्चा पोलीस अधिकारी करत होते.



















