सोलापूर जिल्ह्याचा विकास आराखड्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी जिल्हा नियोजन भवनात विविध मान्यवरांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या लेखी सूचना घेतल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आराखडा तयार करण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्राथमिक बैठक झाली होती. या बैठकीनंतर शनिवारी नियोजन भवन सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व समावेशक बैठक घेण्यात आली.
या बैठकीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालीनी फडणवीस, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे, लोकमंगल समूहाचे मनीष देशमुख यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या आराखड्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी सोलापूर शहराजवळच 500 एकरात असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात मुक्कामी सोय करून वनविहार दर्शन घडवावे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, शहरातील फुटपाथच्या कडेने झाडे लावावी, फुटपाथवरील अतिक्रमण काढून वाट मोकळी करावी, ऍग्रो टुरिझम, पर्यटन विकास, वाहतूक सुविधा विमानसेवा यासह यामध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण व कौशल्य विकास, औद्योगिक उत्पादनांसाठी प्रदर्शन केंद्र, गाव तिथे वाचनालय, औषधी वनस्पती उद्यान, पर्यटन केंद्रांची लघुचित्रफितीच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी, तीर्थक्षेत्री येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा, कृषि विद्यापीठाची निर्मिती, पर्यावरण संवर्धन, सौरउर्जेचा वापर, जुन्या धर्मादाय रूग्णालयांचे पुनरूज्जीवन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आयटीहब, स्टार्ट अप, हुतात्मा स्मृती संग्रहालय निर्मिती, कृषिपूरक उद्योग, क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आदिंबाबत मौलिक सूचना उपस्थित मान्यवरांनी केल्या.
जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, महिला बचत गट अशा सर्वच क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी या सूचना उपयोगी ठरणार असून, या सर्वच सूचनांबाबत पालकमंत्री महोदयांना अवगत केले जाईल व त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली.




















