सोलापूर :महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सरकार बरखास्त झाले आहे त्यामुळे भाजप व शिवसेनेचे बंडखोर आमदारांना सत्ता स्थापन करण्याची वाट मोकळी झाली आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर आहेत ते सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील.
बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यात ते आघाडीवर होते. त्यांना राज्यमंत्री करून जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख यांना जरी मंत्रिपद मिळाले तरी त्यांच्याकडे पालकमंत्री पद येणार नसल्याचे बोलले जात आहे.
शहाजी पाटील यांच्या सोबतच पालकमंत्री पदासाठी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची ही जोरदार चर्चा होत आहे. माढयाचा खासदार निवडून आणल्याबद्दल त्यांना आमदारकीची लॉटरी लागली. मोहिते पाटलांचे जिल्हावर असलेले वर्चस्व पाहता त्यांना मंत्रिपद मिळू शकते असं बोललं जात आहे.
त्याचबरोबर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. युवा चेहऱ्याला संधी मिळाली तर माळशिरसचे आमदार राम सातपुते किंवा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाही मंत्रिपदाचे बक्षीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असेल तर आपला पाठिंबा आहे असे जाहीर केले होते परंतु ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत त्यामुळे त्यांची भूमिका आता काय राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

















