सोलापूर : जनावरांमध्ये आलेला लंपी हा चर्मरोग धोकादायक नसला तरी राज्य सरकारने सावधगिरी बाळगली आहे. सोलापूर जिल्ह्यात शेंगुणी, मांडवे आणि नंदूर या तीन गावांमध्ये लंपी बाधित जनावरे आढळून आली आहेत. जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचे प्रशासन सुद्धा अलर्ट झाले आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लंपी हा विषय जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीरपणे घेतला आहे. स्वामी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी उपस्थित सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सूचना केल्या.
धोत्रे म्हणाले, जिल्ह्यात 3 गावांमध्ये लंपीचा शिरकाव झाला असला तरी हा रोग धोकादायक नाही. ज्याठिकाणी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांपासून पाच किलोमीटर अंतरावर सर्व जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन जनावरांचे गोठे स्वच्छ करण्यास सांगावे, गोशाळा स्वच्छ ठेवाव्या, लक्षणे दिसताच जनावरांचे विलगिकरण करावे अशी माहिती द्यावी, आणि गटविकास अधिकाऱ्यांनो अलर्ट राहा अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.
सीईओ स्वामी म्हणाले, कोरोनाच्या साथीमध्ये ज्या पद्धतीने काम केले त्या पद्धतीने काम करावे लागेल. सर्व विभागाने लंपी बाबत जनजागृती करण्याची गरज आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, पशुला आजार झाला म्हणजे माणसाला आजार होणार नाही, दुधावरही या रोगाचा कोणताही परिणाम होत नाही. जिल्हा परिषदेकडे लस नसल्याची अफवा पसरली आहे मात्र 26500 लस्सी उपलब्ध आहेत. आतापर्यंत 8400 लसीकरण झाले आहे. पशुसंवर्धन विभागातून दहा लाखाची तरतूद करण्यात आली असून याप्रकरणी जिल्हा परिषद कोणतीही हयगय करणार नाही.




















