सोलापूर : केंद्र शासनाद्वारे आझादी का अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान असून सोलापूर जिल्ह्यातील उमेद अभियानच्या महिला प्रभागसंघांना तिरंगा झेंडे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सोलापूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा झेंडा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दीपप्रज्वलन व फित कापतेवेळी महिला अधिकाऱ्यांना उदघाटनाचा सन्मान दिला.
यावेळी झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उमेद अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी, राहुल जाधव, संतोष डोंबे, भगवान कोरे, सुजाता मानगवकर, शीतल म्हनता, सूरज रत्न नदाफ, पूनम दुध्याळ, प्रमोद चिंचुरे, सादिक शेख, पोपट चौधरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना झेंडे मुबलक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राजमुद्रा महिला प्रभाग संघाच्या वतीने झेंडा विक्री केंद्र सुरू असून कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी झेंडे विकत घ्यावे आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन केले.






















