सोलापूर : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून अण्णा उर्फ औदुंबर कौरव नवले याचा धारदार शस्त्राने मारून खून केल्याच्या आरोपावरून अण्णा दत्तात्रय झुंझुर्डे ( रा. कुरुल, ता. मोहोळ) यांच्यासह चारजणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस.जगताप यांच्या समोर होऊन न्यायाधिशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा खटला तब्बल १४ वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे आरोपींच्या डोक्यावर खटल्याची टांगती तलवार कायम होती.
आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दि. १७ जुलै २००८ रोजी अण्णा ऊर्फ औदुंबर नवले याचा खून केल्याचा आरोप अण्णा झुंझुर्डे व इतरांवर ठेवण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही. आरोपी व मयतामध्ये कोणतेही वैमनस्य नव्हते. फरारी आरोपीचा मोबाईल मयताने चोरला होता. त्यावेळी फरारी आरोपींनी मयतास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मरण्यापूर्वी मयत अण्णा हा फरारी आरोपीसोबत होता असा पुरावा आलेला आहे. घटनेशी कोणताही संबंध नसताना झुंझुर्डे कुटुंबीयांना या खटल्यात गुंतविले आहे, असा बचाव आरोपी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने ,ॲड. जयदीप माने, ॲड. रियाज शेख (मोहोळ) ,ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले.
दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्याइतपत पुरावा आरोपीविरुद्ध नसताना त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे आरोपींना विनाकारण १४ वर्षे न्यायालयात हेलपाटे घालावे लागले. खटल्याची १४ वर्षे टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे आरोपींना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे आरोपींच्यावतीने सांगण्यात आले.
.jpeg)
















